शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी दिलेली ३० जून २०२६ ही तारीख शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची असल्याचे ठामपणे स्पष्ट केले आहे. या तारखेवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ही मुदतवाढ तोट्याची नसून, यामुळेच या वर्षातील सर्वाधिक अडचणीत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येणार आहे.
आंदोलनादरम्यान कोर्टाचे आदेश, मुसळधार पाऊस, अपंग शेतकऱ्यांची अडचण आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेला अडथळा अशा चार संकटांमुळे आंदोलन थांबवावे लागले. त्यामुळे, आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी आणि काहीतरी ठोस पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईला चर्चा करण्यासाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे कडू यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांनी आकडेवारीसह हा निर्णय कसा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, हे समजावून सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजवरच्या कर्जमाफी योजनांमध्ये केवळ थकीत (Overdue) कर्जे माफ झाली आहेत. मात्र, यावर्षी (२०२४-२५) अतिवृष्टी आणि कमी भावामुळे सर्वाधिक शेतकरी अडचणीत आले आहेत, आणि त्यांचे कर्ज ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत होणार आहे. सरकारने जर कर्जमाफी आज लगेच जाहीर केली असती, तर या वर्षातील ‘रनिंग’ कर्जे माफ झाली नसती. जून २०२६ ची तारीख मिळाल्यामुळे, हा सर्वाधिक अडचणीतला शेतकरी आपोआप कर्जमाफीच्या कक्षेत येईल.
उदा. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील तीन वर्षांतील थकीत कर्जापेक्षा जास्त कर्ज (१०४ कोटी) २०२४-२५ या एका वर्षात थकीत आहे. त्यामुळे, ही तारीख घेऊन सरकार फसले असून, शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचा त्यांनी युक्तिवाद केला.
या आंदोलनात सरकारने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेला ‘कर्ज वसुली थांबवण्याचा’ निर्णय हा सर्वात मोठा विजय असल्याचे कडू यांनी नमूद केले. शासन निर्णयानुसार, शेतीशी निगडीत कुठल्याही पिकाच्या कर्जाची वसुली करू नये, यासाठी एक वर्षाचा ‘स्टे’ (मुदतवाढ) मिळाला आहे. यामुळे सक्तीची वसुली पूर्णपणे थांबणार असून, थकीत खाते ‘होल्ड’ करण्याची प्रक्रियाही थांबेल. कर्जमाफीची घोषणा आणि तिला मिळालेली तारीख हे मोठे यश आहे.
आता थकीत कर्जदारांना जुने आणि नवीन कर्ज थकीत असतानाही नव्याने कर्ज मिळायला हवे, यासाठी आपला पुढील लढा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचसोबत, ते म्हणाले की, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना पद्धतशीरपणे बदनाम करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मुळापासून संपवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.